मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विविध निर्णयांमुळे शिंदे पक्षातील नेते अस्वस्थ झालेले असताना बदनापूर (जालना) मतदारसंघातील शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या एका तक्रारीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील खरपुडी सिडको प्रकल्पातील जमीन संपादनाला स्थगिती दिली. या प्रकल्पाच्या जमीन संपादनात सिडकोचे ९०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप सांबरे यांनी केला आहे.

राज्य सरकारमधील मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. बुधवारी शिवजयंतीनिमित्ताने बदलापूर येथे शिवपुतळ्याचे अनावरण झाले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला जाणे टाळले. शिंदे- फडणवीस शीतयुद्ध नाही असे या दोन्ही बाजूचे नेते सांगत असले तरी काही घटनांवरून या दोन नेत्यांत नाराजी असल्याचे दिसून येते. एसटी महामंडळात खासगी कंत्राटदारांकडून एक हजार ३१० बस खरेदी करण्याच्या निर्णयाला फडणवीस यांनी स्थगिती दिली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा एसटी महामंडळात वाढलेला हस्तक्षेप पाहता या महामंडळाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी सरनाईक यांच्या विभागातील अपर सचिवावर सोपवून सरनाईक यांना शह देण्यात आला. शिवसेनेच्या अनेक नेत्यांची, आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांनी घेतला. रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप सोडविला जात नाही. या दोन्ही जिल्ह्यांवर शिंदे पक्षाने दावा केला आहे. फडणवीस यांच्या या निर्णयांमुळे शिंदे पक्षातील नेते अस्वस्थ आहेत.

प्रकरण काय?

पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या जालना जिल्ह्यातील खरपुडी या गावाजवळील जमीन सिडकोच्या गृहप्रकल्पासाठी संपादित करण्यात येत आहे. अव्यवहार्य व न परवडणाऱ्या प्रकल्पासाठी या भागातील जमीन संपादनात भूमाफिया, अधिकारी यांच्या संगनमताने ही जमीन संपादित करताना सिडकोचे अर्थात शासनाचे ९०० कोटी रुपये नुकसान झाले असल्याची सांबरे यांची तक्रार आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सांबरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या उपसचिव माया पाटोळे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Story img Loader