गेल्या सात वर्षांत क्षयरोगामुळे मुंबईत तब्बल नऊ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ दररोज या आजारामुळे सरासरी तीन जणांना जीव गमवावा लागला. ही अधिकृत आकडेवारी असून वास्तविक मृत्यूंची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. या आजाराविरोधात सर्वागीण उपाययोजना करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले असून खासगी डॉक्टरांकडून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधे देण्यासाठी ई व्हाउचरची सुविधा सोमवारी आयुक्तांच्या हस्ते सुरू करण्यात आली.
mum01दरवर्षी क्षयरोगाचे सरासरी ३० हजार नवीन रुग्ण आढळतात. नवीन तंत्रज्ञान व पद्धतीमुळे पालिकेने २०१० पासून एमडीआर (मल्टी ड्रग रेझिस्टंट) रुग्ण व २०१२ पासून एक्सडीआर (एक्स्ट्रिमली ड्रग रेझिस्टंट) रुग्णांचीही माहिती ठेवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एमडीआरचे ९३७५ रुग्ण आढळले असून एक्सडीआरच्या ६२७ रुग्णांची नोंद आहे. गेल्या सात वर्षांतील ९ हजार मृत्यूंमध्ये ११४४ मृत्यू एमडीआर रुग्णांचे होते.
औषधे नियमित तसेच पूर्ण कालावधीपर्यंत न घेतल्याने क्षयरोग बळावत असल्याचे लक्षात आल्याने आर्थिक साहाय्य तसेच उपचारांमधील सातत्य ठेवण्यासाठी पालिकेने बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने कार्यक्रम हाती घेतला आहे.
पूरक सकस आहाराची योजना मुंबईभर
एमडीआर रुग्णांना औषधासोबतच सकस आहाराची गरज असते. आरोग्यवर्धिनी या कार्यक्रमांअंतर्गत एमडीआर व एक्सडीआर क्षयरुग्णांना दिवसातून तीन वेळा मोफत पोषक आहार देण्याचा प्रायोगिक स्तरावरील प्रकल्प ३० जानेवारीपासून मुंबईतील शीव व वांद्रे पश्चिम भागात हाती घेण्यात आला होता. १ एप्रिलपासून तो संपूर्ण मुंबईत, त्यानंतर बारा जिल्ह्य़ांत व नंतर राज्यात राबवला जाणार आहे.

Story img Loader