मुंबई : मुंबईतील भटक्या श्वानांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून मुंबईत सध्या ९०,७५७ भटके श्वान असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे. मुंबईत २०१४ मध्ये ९५,१७२ भटके श्वान होते. गेल्या १० वर्षांमध्ये मुंबईतील श्वानांची संख्या साडेचार हजाराने कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या निर्बिजीकरण कार्यक्रमामुळे भटक्या श्वानांची संख्या घटल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबई महानगरपालिका आणि ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल/इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून मुंबईत भटक्या श्वानांच्या सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या सर्वेक्षणाचा अहवाल उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. हा अहवाल महानगरपालिकेच्या https://vhd.mcgm.gov.in/circulars संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या जाणून घेण्यासाठी, तसेच प्राण्यांच्या जन्म नियंत्रणाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे २०२२-२३ मध्ये मूलभूत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. ह्यूमन सोसायटी इंटरनॅशनल/इंडिया या संस्थेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

मुंबई महापालिकेने रस्त्यावरील तसेच झोपडपट्टयांमधील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या निर्बिजीकरणाचा परिणाम दिसून येत असून यामुळे रस्त्यांवरील श्वानांची संख्या ४४१५ ने घटल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तसेच कुत्र्यांच्या घनतेत २१.०८ टक्के आणि झोपडपट्टयांमधील कुत्र्यांच्या घनतेत २७.४ टक्के घट झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

या भागात कुत्र्यांची संख्या वाढली

मुंबईतील बहुतांशी विभागांमध्ये कुत्र्यांची संख्या घटली आहे किंवा स्थिर आहे. मात्र भायखळा, घाटकोपर, कांदिवली, मुलुंडमध्ये श्वानांची संख्या वाढल्याचे आढळून आले आहे. भायखळा, डोंगरीचा भाग असलेला ई विभाग, घाटकोपर, विद्याविहारचा भाग असलेला एन विभाग, कांदिवलीचा भाग असलेला आर दक्षिण विभाग आणि मुलुंडचा भाग असलेला टी विभागात कुत्र्यांची घनता १९.९ टक्क्यांनी वाढली आणि तर ग्रॅंटरोड, मलबारहिलचा भाग असलेल्या प्रभाग डी मध्ये श्वानांच्या संख्येची घनता स्थिर आहे.

कॉलर डॉगची संख्या वाढली

या सर्वेक्षणात प्रथमच कॉलर डॉगची संख्या नोंदवण्यात आली आहे. रस्त्यावर राहणारे, परंतु गळ्यात पट्टा असलेल्या कॉलर डॉगचीही नोंद करण्यात आली. संपूर्ण मुंबईत असे २१० श्वान आढळून आले आहेत. भटक्या श्वानांमध्ये या श्वानांचे प्रमाण ६.१ टक्के आहे.