मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून बीकेसी – कफ परेडदरम्यानच्या टप्प्याचे ९३ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) देण्यात आली आहे. आरे – बीकेसीदरम्यानचा टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल झाला असून बीकेसी – कफ परेड टप्प्यातील बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा लवकरच वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्प्यातील मेट्रो स्थानकांची ९९.०३ टक्के कामे पूर्ण झाली असून यंत्रणांचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान, मार्चअखेरपर्यंत बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, असे एमएमआरसीकडून सांगण्यात आले. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान मेट्रोचे संचलन करण्यासाठी आता एप्रिल महिना उजाडण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो ३ मार्गिकेचे काम करीत असून यापैकी आरे – बीकेसीदरम्यानचा १२.५९ किमी लांबीचा टप्पा १ वाहतूक सेवेत दाखल आहे. तर आता बीकेसी – कफ परेड दरम्यानच्या टप्पा २ चे काम टप्पा २ अ आणि टप्पा २ ब अशा दोन टप्प्यात सुरू आहे. त्यानुसार मंगळवारी एमएमआरसीने ‘एक्स’ समाज माध्यमावरून दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मेट्रो ३ मार्गिकेचे एकूण ९४.७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर बीकेसी – कफ परेडदरम्यानच्या मार्गिकेचे ९३.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण मार्गिकेचा विचार करता बांधकाम ९९.७७ टक्के, यंत्रणांचे काम ८७.७ टक्के, भुयारीकरण १०० टक्के, मेट्रो स्थानकांचे काम ९९.२२ टक्के, कारशडेचे बांधकाम १०० टक्के तर रुळाचे १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्याचवेळी बीकेसी – कफ परेड टप्पा २ च्या कामाच्या आढाव्यानुसार आतापर्यंत यातील मेट्रो स्थानकांचे ९९.२ टक्के, रुळाचे काम १०० टक्के, यंत्रणेचे काम ७८ टक्के तर इतर कामे ५९.६ टक्के पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीने ‘एक्स’ समाज माध्यमावरून दिली. त्याचवेळी बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा २ अ प्रकल्पातील स्थानकांचे ९९.०३ टक्के, तर यंत्रणांचे काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक – कफ परेड टप्पा २ ब मधील स्थानकांचे काम ९७.९८ टक्के आणि यंत्रणांचे काम ७३.२ टक्के पूर्ण झाले आहे.

बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानचा टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने एमएमआरसीची तयारी सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, असे एमएमआरसीकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. या प्रक्रियेला सुरुवात झाल्यास मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांचे पथक मुंबईत दाखल होईल आणि आवश्यक त्या चाचण्या करून या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानंतरच बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक मार्गिकेचे संचलन सुरू होईल. एकूणच ही प्रक्रिया सुरू होऊन हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी आता एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होणार याविषयी एमएमआरसीकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.