मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली – कुसगावदरम्यान १९.८० किमी लांबीच्या नवीन मार्गिकेचे (मिसिंग लिंक) काम हाती घेतले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून आता कामाला वेग देण्यात आला आहे. उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाचे अंतर २० ते २५ मिनिटांनी कमी होणार आहे.

सहा पदरी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून आजघडीला लाखो वाहने धावत असून हा महामार्ग आता अपुरा पडू लागला आहे. दुसरीकडे अपघातांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने महामार्गाच्या आठ पदरीकरणासह खोपोली – कुसगावदरम्यान १९.८० किमी लांबीची नवीन मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला.या प्रकल्पाच्या कामास २०१९ मध्ये दोन टप्प्यात सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनीअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडला, तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आव्हानात्मक काम असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पास विलंब झाला असून आजही या प्रकल्पाचे काम सुरू आहे. आता या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. दरम्यान, आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी ऑगस्टचा मुहूर्त जाहीर केला. हा प्रकल्प ऑगस्टमध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई – पुणे प्रवास ऑगस्टपासून आणखी सुसाट आणि सुकर होण्यास मदत होणार आहे.

एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पातील ९३ टक्के काम पूर्ण झाले असून आता केवळ केबल स्टे पुलाचे काम शिल्लक आहे. या प्रकल्पातील १.७५ किमीच्या एक आणि ८.९२ किमीच्या दुसऱ्या अशा दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, ८.९२ किमी लांबीचा बोगदा आशियातील सर्वांत रुंद, डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात येत आहे. प्रवासी, वाहनांच्याच्या सुरक्षेचा बारकाईने विचार करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. एकूणच अभियांत्रिकीदृष्ट्या अवघड आणि आव्हानात्मक अशा बोगद्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर पथकर नाक्यांच्या विस्तारीकरणासह अन्य कामे मार्गी लागली आहेत. आता केबल स्टे पुलाच्या कामाला वेग देण्यात आला असून केबल स्टे पुलाचे काम येत्या चार – पाच महिन्यांत पूर्ण होईल. एकूण प्रकल्प ऑगस्टमध्ये पूर्ण होऊन मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल.

Story img Loader