दारूबंदीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुजरातमधून मुंबईत येणाऱ्या बेकायदा चरस विक्री करणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. पवई येथील साकीविहारजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हे तिघे चरसची खरेदी-विक्री करताना पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
या तिघांकडे ७९ किलो चरस सापडले असून याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे ९५ लाख रुपये आहे. त्याशिवाय एक टाटा नॅनो गाडीही जप्त करण्यात आली.
गुजरातमध्ये राहणारे फिरोज सुंभानिया आणि शब्बीर सुंभानिया हे मुंबईत येऊन चरसची विक्री करीत. मंगळवारी हे डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ चरस विक्रीसाठी येणार असल्याची खबर घाटकोपर पोलिसांना मिळाली. ही खबर मिळाल्यानंतर साहाय्यक पोलीस आयुक्त काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा लावला.
या सापळ्यात सलीम डोला हा मुंबईतील रहिवासी, फिरोज सुंभानिया आणि शब्बीर सुंभानिया या तिघांना ६१ किलो चरससह पकडण्यात आले. त्याचबरोबर शब्बीर आणि फिरोज यांनी आणलेल्या टाटा नॅनोची झडती घेतली असता त्यात १८ किलो चरस सापडले. एकूण ७९ किलो चरस आणि टाटा नॅनो ताब्यात घेत पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. अंमली पदार्थ विरोधी कक्ष या प्रकरणाचा तपास करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा