मुंबई : एमएचटी सीईटीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी गट) या गटाची परीक्षेला ९ एप्रिलपासून सुरुवात होत असून, यासाठी अर्ज भरलेल्या ३ लाख १ हजार ७३ विद्यार्थ्यांपैकी ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळाले आहे. तसेच ३.६८ टक्के विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वैद्यकीय आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यंदा पीसीबी गटासाठी राज्यभरातून ३ लाख १ हजार ७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात १ लाख ७५ हजार ३११ विद्यार्थिनी असून १ लाख २५ हजार ७५१ विद्यार्थी आहेत. तसेच ११ तृतीयपंथीय विद्यार्थी आहेत.

या विद्यार्थ्यांना गुरुवारीपासून ऑनलाईन लॉगीन आयडीमध्ये प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार ३ लाख १ हजार ३७ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८९ हजार २८६ म्हणजेच ९६.३२ टक्के विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे. तर ९ हजार २९ म्हणजेच ३ टक्क विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असून, तर २ हजार ५८ म्हणजे ०.६८ टक्के विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे.

मात्र पहिल्या पसंतीचे केंद्र हे विद्यार्थी राहत असलेल्या जिल्ह्यातील असून, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र हे अन्य जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस अगोदर परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सर्व विद्यार्थिंनींना पहिल्या पसंतीचे केंद्र

पीसीबी परीक्षेसाठी ११ हजार ८७ विद्यार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचे केंद्र मिळाले असले तरी या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व १ लाख ७५ हजार ३११ विद्यार्थिंनींना पहिल्या पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी मुलींना दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करावा लागू नये याची काळजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेतल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे नोंदणी केलेल्या ११ तृतीयपंथींयापैकी १० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे केंद्र देण्यात आले आहे.

सामाईक प्रवेश परीक्षा ही संगणक आधारित असल्याने जिल्हानिहाय केंद्रे तयार करावी लागतात. प्रत्येक तालुक्यामध्ये पुरेशी केंद्र उपलब्ध करणे शक्य नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रांसंदर्भात अन्य पर्याय भरून घेतले जातात. मात्र विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचेच केंद्र मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात. दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष