पश्चिम रेल्वेवरील बंद झालेली स्वस्तात शुध्द पाणी उपलब्ध करणारी वॉटर वेंडिंग यंत्र सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण ९७ वॉटर वेंडिंग यंत्रे बसवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. ९७ पैकी ६७ यंत्रे मुंबई उपनगरीय स्थानकांत बसविण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> राष्ट्रगीत अवमान प्रकरण : ममता बॅनर्जी यांच्या अपिलावरील निर्णय राखीव; समन्सला ममता यांनी विशेष न्यायालयात आव्हान दिले आहे
प्रवाशांना स्वस्तात शुध्द आणि गार पाणी मिळावे यासाठी आयआरसीटीसीने मध्य व पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांमध्ये वॉटर वेंडिंग यंत्रे बसविण्यात आली होती. काही स्थानकांतील लुप्त पावलेल्या पाणपोईंमुळे नवीन सेवेचा प्रवाशांना चांगलाच फायदा झाला. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार, डहाणू, पालघर, उधनासह अन्य काही स्थानकांत ही यंत्रणे बसविण्यात आली होती. प्रवाशांना बाटलीमध्ये ३०० मिलि लिटर पाणी हवे असल्यास त्यासाठी एक रुपया आणि रेल्वेकडील बाटली किंवा ग्लासमध्ये हवे असल्यास दोन रुपये मोजावे लागत होते. ५०० मिलीलीटर पाण्यासाठीही अनुक्रमे ३ रुपये आणि पाच रुपये, एक लिटर पाण्यासाठी अनुक्रमे पाच रुपये आणि आठ रुपये, दोन लिटर पाण्यासाठी आठ रुपये आणि १२ रुपये दर निश्चित करण्यात आला होता. या सुविधेला प्रवाशांकडून पसंतीही मिळाली होती. मात्र करोनाकाळात बंद ठेवलेली वॉटर वेंडिंग सेवेचे प्रकरण त्यानंतर न्यायप्रवीष्ट झाले आणि ही सेवा आयआरसीटीसीने बंद केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही ही सेवा अद्याप सुरूच झाली नव्हती. पश्चिम रेल्वेने ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> बेकायदा अटक-सीबीआय कोठडीला आव्हान : याचिकेवरील तातडीच्या सुनावणी घ्या ; कोचर दाम्पत्याची मागणी उच्च न्यायालयाकडून मान्य
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण ९७ वॉटर वेंडिंग यंत्रे बसवण्यात येणार आहेत. यापैकी चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंतच्या एकूण ३७ स्थानकांत ६७ यंत्रे बसवण्यात येणार आहेत. तर पालघर, उदवडा, उधना, सुरत, नंदुरबार या स्थानकांतही ही यंत्रे उपलब्ध करणे, बसविणे आणि त्याची सुविधा प्रवाशांना देण्यासाठी विविध कंत्राटदारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या यंत्राद्वारे उपलब्ध केल्या जाणाऱ्या पाण्याचे दर निश्चित करण्यात येणार आहेत.