शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : राज्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये करोना उपचारांच्या विम्याच्या दाव्यांच्या संख्येत सुमारे साडेचारशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात करोनाशी संबंधित तब्बल सुमारे ९ हजार ७६६ कोटी रुपयांचे विम्याचे दावे दाखल झाले आहेत. देशभरात सुमारे ३६ हजार ४९२ कोटी रुपयांचे दावे भरपाईसाठी खासगी विमा कंपन्यांकडे आले असून यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे ३२ टक्के दावे हे महाराष्ट्रातील आहेत.
मार्च २०२० पासून राज्यात करोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. पहिल्या लाटेमध्ये म्हणजे मार्च ते ऑक्टोबर २०२० मध्ये राज्यभरात करोना उपचारासंबंधी सुमारे २१०० कोटी रुपयांच्या भरपाईसाठी सुमारे १ लाख ७२ हजार विमादावे दाखल झाले होते. करोनाची दुसरी लाट तीव्र होती आणि या काळात रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. तसेच रुग्णालयातील खर्चाची किंमतही जास्त होती. त्यामुळे दुसऱ्या लाटेत दाखल होणाऱ्या विम्याच्या दाव्यांची संख्याही जवळपास साडेचारशे टक्क्यांनी वाढली. तिसरी लाट त्या तुलनेत सौम्य असल्यामुळे या काळातही रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी होती.
ऑक्टोबर २०२० ते मार्च १४ मार्च २०२२ या काळात राज्यभरात करोना उपचाराशी निगडित दाव्यांची संख्या सुमारे १ लाख ७२ हजारांवरून थेट सुमारे ७ लाख ८० हजारांवर गेली आहे. भरपाईच्या रक्कमेची किंमतही सुमारे २१०० कोटी रुपयांवरून सुमारे ७ हजार ६६ कोटी रुपयांपर्यत वाढली.
देशभरातही हेच चित्र कायम असून दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये देशभरात सुमारे २४ लाख ८७ हजार विम्याचे दावे आले. पहिल्या लाटेमध्ये हे प्रमाण सुमारे ४ लाख ३८ हजार होते. त्यासाठी २९ हजार ७९२ कोटी रुपये भरपाईची मागणी झाली आहे. पहिल्या लाटेत देशभरात सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपयांसाठी दावे दाखल झाले होते.
मृत्यूचे दावे २ टक्के
* राज्यभरात मार्च २०२० पासून ७८ लाख ७३ हजार करोनाबाधितांची नोंद झाली असून १ लाख ४७ हजार ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु राज्यभरात दाखल झालेल्या एकूण दाव्यांमध्ये २० हजार ४६३ म्हणजे दोन टक्के दावे मृत्यूनंतरच्या भरपाईसाठी दाखल झाले आहेत. अन्य सर्व दावे हे करोना उपचार घेतलेल्यांचे आहेत.
* राज्यात दोन वर्षांत ११ लाख ५२ हजार २८६ रुग्णांनी उपचार खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. राज्यात आतापर्यंत ९ लाख ५२ हजार २७६ विम्याचे दावे दाखल झाले. यातील जवळपास ८० टक्के रुग्णांनी दावे दाखल केले आहेत.
* राज्यात सरासरी १,०२,५५८ रुपयांचे दावे दाखल झाले असून यातील ७६,२२४ रुपयांची भरपाई करण्यात आली आहे. दाव्यामध्ये दाखल केलेल्या एकूण रक्कमेपैकी ७४ टक्के रुपयांची भरपाई विमा कंपन्यांकडून केली जात असल्याचे दिसून येते.