मुंबई : गोरगाव पूर्व येथे मंगळवारी सकाळी दुचाकीवरून शाळेत जाणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला, तर तिचे वडील जखमी झाले. मृत मुलीचे नाव विन्मयी मोरे असून ती वडील रमेश मोरे यांच्यासोबत दुचाकीवरून सकाळी ६.३० वाजता शाळेत जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते पश्चिम द्रुतगती मार्गावर दिंडोशी येथील शाळेच्या दिशेने जात होते. त्यावेळी वळण घेत असताना एका डंपरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

डंपरची जोरदार धडक बसल्यामुळे मुलगी दुचाकीवरून रस्त्यावर पडली व तिला गंभीर दुखापत झाली. तिचे वडीलही जखमी झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी विन्मयीला मृत घोषित केले. विन्मयीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा – दादरमध्ये वृद्ध पित्याकडून तरुणाची हत्या

हेही वाचा – मुंबई : रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाला सुरुवात, आयआयटीची गुणवत्ता तपासणीही सुरू

जखमी रमेश मोरे हे व्यवसायिक आहेत. त्यांना एक मुलगा असून ते मालाड पूर्व परिसरात राहतात. पादचाऱ्यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही रुग्णालयात हलवले. हा अपघात ओबेरॉय मॉलजवळ महामार्गावरून फिल्मसिटीकडे जाताना झाला. मुलीच्या अंगावरून गाडी गेल्याचे बोलले जात आहे. पण त्याला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. डंपर चालक राहुल जाधव (२२) घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी डंपरच्या मालकाचा शोध घेतला. त्यानंतर चालकाचा शोध लागला. प्राथमिक तपासात चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याचा कोणताही पुरावा नाही. विन्मयी इयत्ता सातवीत शिकत होती. पोलिसांनी चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.