मुंबईत पावसाने रविवारी मध्यरात्री अक्षरश: थैमान घातलं. तीन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडली. चेंबूर भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, तर विक्रोळीतही ३ लोकांचा मृत्यू झाला. तर भांडुप येथे संरक्षण भिंत पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. भांडुप अमरकोट शाळा परिसरात भिंत कोसळून सोहम थोरत या तरुणाचा मृत्यू झाला. घराबाहेर साचलेलं पाणी काढत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. मुंबईत घडलेली ही तिसरी घटना आहे. या घटनेनंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भांडुप येथील घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनावर टीकास्त्र सोडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हे पूर्णपणे महापालिकेच्या निष्क्रियतेचे बळी आहेत. मुंबईत पाऊस दरवर्षी पडतो. दरवर्षी पाणी तुंबतं. तुंबणारी ठिकाणं कोणती?, धोकादायक ठिकाणी कोणती? आपल्याकडे सर्व डेटा असतो. केवळ आपण नोटीसा चिकटवल्या की जबाबदारी संपते का?, त्यांनी कुठे राहायचं? खायचं काय याची सर्व व्यवस्था केली असती, तर ती लोकं शिफ्ट होतील. आता मृत्यू झाल्यानंतर सांगायचं नोटीसा दिल्या होत्या. जबाबदारी संपली का? तुम्हाला जबाबदारीपासून पळता येणार नाही. या घटनेला सर्वस्वी महापालिका जबाबदार आहे. त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी. यानंतर दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी. नाही तर लोकं मेल्यावर दोन लाख, पाच लाख द्यायचं आणि संपलं. तुमच्या पाच-दहा लाख रुपयांनी गेलेले जीव येणार आहेत का?” अशी टीका विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालिका आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

केंद्रानंही जाहीर केली २ लाखांची मदत

मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासूच मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणवार पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 16 year old boy died wall collapsed in bhandup pravin darekar visit on spot rmt