मुंबईतल्या साकीनाका भागात एका महिलेची चालत्या रिक्षात गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली आहे. ही महिला विवाहित होती. रिक्षाने प्रवास करत होती. त्याचवेळी दीपक बोरसे आणि या महिलेचा वाद झाला. त्यानंतर दीपक बोरसेने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर स्वतःलाही जखमी केलं. दीपक बोरसेचे या महिलेशी प्रेमसंबंध होते अशीही माहिती समोर आली आहे. त्यातून हा हल्ला झाल्याचंही समजतं आहे. या घटनेविषयी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकी काय घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकीनाक्यातील खैराणी रोड भागात ही घटना घडली. दीपक बोरसे आणि ही विवाहिता रिक्षेतून जात होते. कुठल्यातरी कारणावरुन या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दीपक बोरसेने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला. स्वतःलाही जखमी करुन घेतलं आणि पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. मृत महिलेचं लग्न झालेलं आहे. तिला एक मुलगाही आहे. सध्या तिचं तिच्या पतीशी पटत नसल्याने ती तिच्या माहेरी राहात होती. दीपक बोरसेशी तिचे प्रेमसंबंध जुळले. त्याने भांडण झाल्यानंतर तिची हत्या केली.
या घटनेविषयी सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली चिंता
साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. ही अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरीक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे.