मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाआड आलेले ४० वर्षे जुने काली माता मंदिर पालिकेच्या पी उत्तर विभागाने शुक्रवारी हटवले. रस्त्याच्या मधोमध असलेले हे मंदिर हटवल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिराशी संबंधितांना कायद्यानुसार २५ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. सुमारे १२.२ किमी लांबीचा हा मार्ग चार ते पाच विभागांतून जातो. या मार्गावर अनेक ठिकाणी बांधकामे, अनधिकृत बांधकामे असल्यामुळे ती टप्प्याटप्प्याने हटवली जात आहेत. या प्रकल्पाच्या मार्गावरील अनेक बांधकामे आतापर्यंत टप्प्याटप्प्याने हटवण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी या रस्त्याच्या मधोमध असलेले एक मंदिरही हटवण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘चांगली’, शनिवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४५ वर

सुमारे २०० चौरस फूट जागेत असलेले काली माता मंदिर ४० वर्षे जुने होते. मात्र रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी (बॉटलनेक) होत होती. हे मंदिर हटवल्यामुळे या प्रकल्पाला वेग येणार आहे. तसेच मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासही मदत होणार आहे. मालाडमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पी/ उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने एकापाठोपाठ एक रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

अत्यंत संवेदनशील अशी ही कारवाई पार पाडण्यात आली असून पालिकेच्या कायद्यानुसार मंदिराशी संबंधितांना २५ लाख रुपये मोबदला देण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. एक जेसीबी सयंत्र, २० कामगार आणि पाच अभियंते यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.