लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : विक्रोळी येथे पूर्वी द्रुतगती महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ६९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात विक्रोळी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला असून सीसी टीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.

नंदकुमार मळेकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते कुटुंबियांसोबत घाटकोपर पूर्व लक्ष्मी नगर परिसरात रहात होते. ते गृहनिर्माण संस्थेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. दुपारी दोन वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत त्यांच्या कामाचा कालावधी होता. मंगळवारी दुपारी जेऊन झाल्यावर ते कामावर जाण्यास घरातून निघाले. रात्री नऊच्या सुमारास मुलीला दूरध्वनी करून मी थोड्या वेळाने निघेन. माझे जेवण करून ठेवा असे नंदकुमार यांनी घरी सांगितले. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास अकबर खान नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी मळेकर कुटुंबियाना आला. त्याने गोदरेज घोडागेट सिग्नलजवळ वडिलांचा अपघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर विक्रोळी पोलिसांनी कुटुंबियांना दूरध्वनीवरून संपर्क साधा. नंदकुमार यांना अनोळखी वाहनाने धडक दिली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपाचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी मळेकर कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर त्यांचा मुलगा राजावाडी रुग्णालयात पोहोचला असता तेथील डॉक्टरांनी वडिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मृत घोषित केले होते.

आणखी वाचा-मेट्रो ३ च्या ताफ्यात आठ मेट्रो गाड्या दाखल, आता केवळ एका गाडीची प्रतीक्षा

याप्रकरणी नंदकुमार यांचा मुलगा नवीन मळेकर यांच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी बुधवारी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस सीसी टीव्हीच्या मदतीने आरोपी वाहन चालकाचा शोध घेत आहेत.