मुंबई : रिक्षाने प्रवास करताना दहिसर येथील नितीन शिळीमकर (५३) त्यांच्याकडील १२ तोळे साेने असलेली बॅग रिक्षामध्येच विसरले. त्यासांदर्भात त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आणि अवघ्या दोन तासांमध्ये बॅग शोधून नितीन शिळीमकर यांना परत केली. पोलिसांच्या या तत्पर व कौशल्यपूर्ण कार्यवाहीमुळे शिळीमकर यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.
दहिसरमधील ओवरीपाडा येथील राधाबाई रूपजी चाळ येथे राहणारे नितीन शिळीमकर (५३) २६ एप्रिल रोजी पहाटे ५.५० च्या सुमारास ओवरीपाडा परिसरातून नॅन्सी डेपो येथे रिक्षाने जात होते. नॅन्सी डेपो येताच ते रिक्षातून उतरले आणि इच्छितस्थळी गेले. मात्र सोबत असलेली १२ तोळे सोन्याची बॅग ते रिक्षातच विसरले. बॅग रिक्षामध्ये विसरल्याचे थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात आले. बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आल्यावर नितीन शिळीमकर यांनी सकाळी ६.३० च्या सुमारास दहिसर पोलीस ठाणे गाठले आणि या घटनेची माहिती दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, रात्रपाळीचे पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी मसलकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक इर्शाद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पोलीस हवालदार राजू नार्वेकर, पोलीस शिपाई बसवेश्वर चुंगीवडियार, पोलीस शिपाई पंडित राठोड, पोलीस शिपाई विलास आव्हाड व पोलीस शिपाई निलेश शनवार यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली.पोलिसांच्या पथकाने नॅन्सी डेपो परिसरातील सुमारे १५ ते २० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी संबंधित रिक्षा नॅशनल पार्क येथे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने नॅशनल पार्क येथे जाऊन त्याचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना नॅशनल पार्क येथे रिक्षा व त्यामध्ये विसरलेली बॅग सापडली.
तक्रारदार नितीन शिळीमकर यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून अवघ्या दोन तासांमध्ये १२ तोळे सोने असलेली बॅग शोधून काढली. दहिसर पोलिसांनी तातडीने नितीन शिळीमकर यांना पोलीस ठाण्यात बोलवून खातरजमा करून त्यांच्याकडे सोने असलेली बॅग सुपूर्द केली, अशी माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.