मुंबई: ‘बॅड न्यूज’ चित्रपटामुळे सध्या सगळीकडे चर्चेत असलेला अभिनेता विकी कौशल हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित करीत असलेल्या ‘छावा’ या ऐतिहासिकपटात संभाजी महाराजांची भूमिका करीत आहे. उतेकरांबरोबर विकीने याआधीही एका चित्रपटात काम केले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास असल्याचे सांगतानाच ग्रामीण भागात लहानाचे मोठे झालेल्या आणि कधीकाळी शिवाजी पार्कवर वडापावच्या दुकानापासून सुरुवात करीत हिंदी – मराठीतील प्रथितयश दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या उतेकरांवरच चरित्रपट होऊ शकतो, अशा शब्दांत विकी कौशलने या मराठमोळ्या दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे.

‘बॅड न्यूज’ या आनंद तिवारी दिग्दर्शित चित्रपटात विकी कौशलने अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि पंजाबी अभिनेता ॲमी वर्क यांच्याबरोबर काम केले आहे. १९ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना विकीने लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटाविषयीही मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘छावा’ हा एकाअर्थी माझा आणि उतेकर दोघांचाही पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. त्यांच्याबरोबर याआधी मी आणि सारा अली खानने ‘जरा हटके, जरा बचके’ या चित्रपटात काम केले होते. त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे, एखादा मित्र वा मोठा भाऊ असावा तसा मी त्यांचा आदर करतो, असे विकीने सांगितले. ग्रामीण भागात लहानाचे मोठे झाले असल्याने त्यांच्या राहणीमानात आणि स्वभावातही साधेपणा आहे जो आपल्याला खूप आवडत असल्याचे त्याने सांगितले. उतेकर यांचे शिवाजी पार्कवर वडापावचे दुकान होते, तिथून त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि आज ते उत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत, त्यांची आजवरची वाटचाल निश्चितच वाखाणण्याजोगी असल्याची भावना विकीने व्यक्त केली.

हेही वाचा – तेजस ठाकरेंचा अंबानींच्या लग्नात डान्स, आशिष शेलार आणि सुषमा अंधारेंमध्ये सोशल मीडियावर खडाजंगी

हेही वाचा – मुंबई : वेसावे भागातील अनधिकृत इमारतींवर महापालिकेचा हातोडा, आणखी सात ते आठ इमारतींवर कारवाई करणार

आम्ही दोघे चाळकरी…

दिग्दर्शक म्हणून लक्ष्मण उतेकर यांच्याबरोबर जोडून घेणारा चाळ हा आणखी एक समान धागा असल्याचेही विकीने सांगितले. ‘मला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते, कारण माझा जन्मदेखील एका चाळीत झाला आहे. त्यांच्याप्रमाणेच अतिशय मेहनतीने वाटचाल करीत मी आता कुठे हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून ओळख मिळवली आहे, त्यामुळे आमच्यामधील नाते खास आहे. शिवाय, त्यांचे चित्रपट हे सामान्य प्रेक्षकांसाठी असतात. चित्रपट पाहिल्यानंतर काही वेळासाठी प्रेक्षकही ताण विसरून जातात. ज्यांना उत्तम कथा पहायची असते, अशा प्रेक्षकांसाठी ते चित्रपट बनवतात. त्यांचा हा गुण आपल्याला अधिक भावतो, असेही विकीने स्पष्ट केले.