मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य शिबीर घेण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संकल्पाला सुरुवात झाली आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे जनआरोग्य वर्ष शनिवारी रक्तदान शिबिराने सुरू करण्यात आले. तर ३ ऑगस्टला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्योत्सवाची सुरुवात होणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील काही मंडळांनी यंदा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करता सामाजिक काम, आरोग्य शिबिरे घेण्याचा संकल्प केला. १०१ वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाने यंदा उंच मूर्ती न आणता जनआरोग्य वर्ष साजरे करण्याचे ठरविले आहे. शनिवारी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी एकूण १८८ रक्तदात्यांचे रक्त वाडिया रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने संक लित क रण्यात आले.

३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सव होणार असून त्याची रूपरेषा शनिवारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून जाहीर करण्यात आली. या उत्सवातील रक्तद्रव दान शिबिराचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते ३ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता लालबाग मार्केट येथे होईल. केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर होणार असून ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळात रक्तद्रव दानाकरिता नोंदणी करता येणार आहे.

याच कालावधीत गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षांत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये व शौर्यचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच करोनाविरोधी लढाईत जनतेची सेवा करताना प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये व शौर्यचिन्हाने सन्मानित केले जाईल. तर २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात विविध आस्थापनांतील कोविडयोद्धय़ांचा सन्मान केला जाणार असून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबीर घेतले जाणार आहे.