राज्यातील सत्तांतरानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना वेग दिला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलातून सुरुवात होणार असून ठाणे – शिळफाटादरम्यान २१ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली.
हेही वाचा >>>मुंबई : २५०० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन प्रकरण :आठ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल
पुढील वर्षाच्या सुरुवातीला या कामांसाठी निविदा मागविण्यात येणार असून १२ जानेवारी २०२३ रोजी निविदा जारी करण्यात येणार आहे. तसेच २० जानेवारी २०२३ रोजी निविदा उघडण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रक्रियेला आणखी वेग येईल. वांद्रे कुर्ला संकुल-ठाणे शिळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गात सात किलोमीटर मार्ग हा समुद्राखालून जाणार असून भारतातील समुद्राखालून जाणारा हा पहिलाच मार्ग आहे, असे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण भुयारीमार्गापैकी पाच किलोमीटरच्या भुयारीमार्गासाठी ऑस्ट्रियात राबविलेल्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. हा मार्ग जमिनीपासून २५ ते ६५ मीटर खोलवर असेल आणि शिळफाटा पारसिक हिलजवळ आणखी खोलवर काम होणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई : करोना संसर्ग आटोक्यात आल्याने मुंबईतील दहा जम्बो करोना केंद्र बंद
दरम्यान, बुलेट ट्रेनचे वांद्रे – कुर्ला संकुल येथे भूमीगत स्थानक होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी एक हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक ४.९ हेक्टर जागेत उभारले जाणार असून १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार आहेत. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे. त्यासाठीही निविदा प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली असून येत्या ऑक्टोबरमध्ये निविदा खुली होणार आहे.
बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात भूसंपादनाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू होती. राज्यात सत्तातरानंतर भूसंपादनालाही गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी राज्यातील ४३३.८२ हेक्टर जागा लागणार असून आतापर्यंत ४१४ हेक्टर म्हणजेच ९५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. तर नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला ५० टक्के जमिनीचा ताबा मिळाला आहे.