मुंबई: अडीच कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी शोध सुरू असलेल्या एका व्यावसायिकाला दोन वर्षांनंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. टियुबभाई रुस्तम पटेल असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याच्याविरोधात दिसता क्षणी ताब्यात घेण्याची सूचना (लुक आऊट सर्क्युलर) देण्यात आली होती. पंजाब पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले
पंजाबचे रहिवासी असलेले राजपाल सिंह हे व्यावसायिक असून त्यांचा सायकलचे सुटे भाग विक्रीचा व्यवसाय आहे. टियुबभाई हादेखील या व्यवसायाशी संबंधित आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून राजपाल सिंग आणि टियुबभाई पटेल हे एकमेकांच्या परिचित असून त्यांच्यात अनेकदा सुटे बाभ खरेदी विक्रीचा व्यवसाय झाला होता. राजपाल हे पंजाबचे मोठे वितरक असल्याने त्यांनी त्याला कोट्यवधी रुपयांचे सुटे भाग दिले होते. मात्र त्याची रक्कम मिळाली नव्हती. सुमारे अडीच कोटी रुपये टियुबभाईकडून तक्रारदार राजपाल सिंह यांना येणे बाकी होते. वारंवार विचारणा करुन तो त्यांना टाळत होता. त्याच्याकडून फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी टियुबभाई पटेलविरुद्ध पंजाबच्या चंदीगढ शहरातील मोतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> मुंबईः कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून तीन तरुणांची फसवणुक
आरोपी व्यावसायिक त्याच्या कुटुंबियांसह विदेशात वास्तव्यास होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पंजाब पोलिसांकडून दिसता क्षणी ताब्यात घेण्याची सूचना देण्यात आली होती. आरोपी झिम्बॉवे येथून शनिवारी पहाटे चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी टियुबभाईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्याच्या अटकेची माहिती सहार पोलिसांकडून मोतीनगर पोलिसांना देण्यात आली होती. रविवारी संबंधित पोलीस मुंबईत आले व त्यांनी आरोपीचा ताबा घेतला. त्यानंतर रविवारी सायंकाळी त्याला घेऊन मोतीनगर पोलिसांचे पथक पंजाबला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.