मुंबई : सीमाशुल्कापोटी सात कोटी रुपये बुडवल्याच्या आरोपाखाली महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) डोंबिवलीतील एका कंपनीच्या भागिदाराला अटक केली. गेल्या पाच वर्षांत चीनमधून कमी किमतीत वस्तूंची आयात करून सीमाशुल्क बुडवल्याचा व्यावसायिकावर आरोप आहे. त्यासाठी बनावट पावत्यांचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमधील कंपन्यांच्या मदतीने हा प्रकार सुरू असल्याचा डीआरआयला संशय आहे. डोंबिवली पूर्व येथील मानपाडा परिसरात राहणाऱ्या राजेश वैष्णव याला बुधवारी डीआरआयने अटक केली. याप्रकरणी त्याच्या भिवंडीतील गोदामावरही डीआरआयने शोधमोहीम राबवली. वैष्णव नियंत्रीत करीत असलेल्या तीन कंपन्या वस्तूंची आयात व स्टेशनरी वस्तूंची विक्री करतात. आरोपीने आयात केलेल्या वस्तूंचे कागदोपत्री ५० ते ६० टक्के कमी मूल्य दाखवल्याचा डीआरआयला संशय आहे. याप्रकरणी साक्षीदारांकडून डीआरआयला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी लॅपटॉपच्या पावत्या तयार करून चीनमधील कंपन्यांकडे पाठवायचा. त्यानंतर ते या पावत्यांवर स्टॅम्प मारून व स्वाक्षरी करून मालासोबत पाठवत होते. उर्वतीत रक्कम हवालामार्फत चीनमधील कंपन्यांना पाठविण्यात येत होती. त्यानंतर या वस्तूंची भारतीय बाजारात विक्री करण्यात येत होती. डीआरआयने आरोपीला सीमा शुल्क कायद्यांतर्गत अटक केली असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A businessman who embezzled rs 7 crore customs duty arrested mumbai print news ysh
Show comments