मुंबई : विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी नवी मुंबईतील डायल ११२ क्रमांकावर आला होता. दूरध्वनीनंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. तपासणीत सातारा येथे राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलाने दूरध्वनी केल्याचे उघड झाले.
नवी मुंबईतील डायल ११२ क्रमांकावर गुरुवारी हा दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने विमानतळावरील एका विमानात बॉम्ब ठेवला आहे. ते विमान १० तासांनी तेथून निघणार असून मदतीची आवश्यकता असल्याचे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. या माहितीनंतर डायल ११२ क्रमांकावरून तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली. दहशतवाद विरोधी यंत्रणा, सहार पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथकाला सतर्क करण्यात आले. तसेच संपूर्ण विमानतळाची पाहणी करण्यात आली.
तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दूरध्वनी आलेल्या क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तो दूरध्वनी क्रमांक सातारा येथील एका व्यक्तीचा असल्याचे उघड झाले. त्याला विचारले असता त्यांच्या १० वर्षांच्या अपंग मुलाने चुकून दूरध्वनी केला, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली.