मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात माहीम परिसरात लावण्यात आलेल्या पोस्टरविरोधात माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहीम परिसरात असे २९ बॅनर्स लावण्यात आले होते.
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर विरोधकांनी मोठा गोंधळ घातला होता. त्यानंतर आता मुंबईतील माहीम परिसरात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचे छायाचित्र औरंगजेबासोबत एकत्र करून त्याचे पोस्टर लावण्यात आले होते. तसेच या पोस्टरवर दोन्ही नेत्यांबद्दल बदनामीकारक मजकूर नमुद करण्यात आला होता. माहीम परिसरात रात्रीच्या वेळी हे पोस्टर्स लावण्यात आले होते. ते कोणी लावले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हे पोस्टर्स आता काढण्यात आले आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पोलिसांनी स्वतःच याप्रकरणी तक्रार दाखल करून अनोळखी व्यक्तीविरोधात भादंवि कलम ५०५ (२) (सार्वजनिक आगळीकता निर्माण होण्यास पोषक कृत्य करणे) व महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात येत आहे.