मुंबईः गणेशोत्सवाच्या काळात गिरगाव चौपाटी येथे विनापरवागी ड्रोन उडवणाऱ्या पाच जणांविरोधात डी. बी. मार्ग पोलिसांनी गुन्हे दाखल केला. पोलिसांनी या कारवाईत तीन ड्रोन जप्त केले. गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेली ५८ जण हरवले होते. त्यात ३९ मुलांचा समावेश होता. त्यांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात पोलिसांना यश आले.
गणेशोत्सवासाठी परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतचे आदेशही पोलिसांनी जारी केले होते. पण त्यानंतरही गिरगाव चौपाटीवर विनापरवानगी ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले. या कारवाईत तीन ड्रोन जप्त करण्यात आले. तसेच ड्रोन उडवणाऱ्या पाच व्यक्तींविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २२३ व ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या कारवाईत पोलीस शिपाई कुश पाटील यांना गिरगाव चौपाटी परिसरात तीन व्यक्ती ड्रोन उडवताना सापडले. त्यांच्याकडे परवानगीबाबत विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्यांच्यााविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईत एक ड्रोन जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – आमची दैना… असुविधांचा लोको पायलटना फटका, २०४ लोको कॅबमध्ये स्वच्छतागृह नाही
दुसऱ्या कारवाईत पोलीस शिपाई अजरुद्दीन नगारजी यांना दोन व्यक्ती ड्रोन उडवत असताना सापडले. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन ड्रोन जप्त केले. सुरक्षेच्या कारणावरून गणेशोत्सवापूर्वी मुंबई पोलिसांनी आदेश जारी करून परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यावर बंदी घातली होती. याबाबतची माहिती प्रसारितही करण्यात आली होती. त्यानंतरही आरोपींनी परवानगीशिवाय ड्रोन उडवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
५८ हरवलेल्या व्यक्तींचा शोध
गिरगाव परिसरात हरवलेल्या ५८ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची कुटुंबियांशी भेट घालून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात ३९ लहान मुलांचा समावेश आहे. यात २ ते १७ वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश आहे. याशिवाय १२ व्यक्तीही बेपत्ता झाल्या होत्या. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. त्यांचीही कुटुंबियांसोबत भेट घालून देण्यात आली. त्यासाठी गिरगाव परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे हरवलेल्या व्यक्तींची माहिती कुटुंबियांपर्यंत देण्यात आली. तसेच छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठीही गिरगाव परिसरात साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले होते.