मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभेतून बदनामी व त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना चौकशीकरता बोलवत त्यांना तात्काळ अटकही करण्यात आली आहे. ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपाधीवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली.
सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
हेही वाचा… सरकारी नोकरभरतीला वेग; २२ हजार पदांच्या भरतीसाठी लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर
त्यानुसार भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३ (अ), १५३ (ब), १५३(अ)(१) सी, २९४, ५०४, ५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी भांडुप पोलीसांनी दत्ता दळवी यांना अटक केली आहे.