मुंबई : घर देण्याचे तसेच व्यवसायात गुंतवणूकीतून चांगला परतावा देण्याच्या नावाखाली १२ जणांची सुमारे पावणे दोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात श्वानपथकात कार्यरत उपनिरीक्षकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.दादर पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून फसवणूक करण्यात आलेले अनेक जण आरोपी पोलिसाच्या परिचयाचे आहेत.
दादर परिसरात राहणारे अभिजित पाटील (४५) यांच्या तक्रारीनुसार, २०१६ ते १० जानेवारी २०२४ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. पाटील यांच्या तक्रारीनुसार या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात बुधवारी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने मैत्रीचा व विश्वासाचा फायदा घेऊन जुलै २०१६ ते तक्रारदार यांच्यासह त्यांच्या ओळखीतील ११ जणांना विश्वास संपादन करून काहींना स्वत: घर देतो असे सांगितले. तर काहीना टिशू पेपरचा कारखाना टाकणार असून त्यासाठी भांडवल दिल्यास जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले, असा आरोप आहे. सर्वांकडून मिळून एकूण एक कोटी ६९ लाख रुपये घेण्यात आले आहेत मात्र घर अथवा पैसे काहीही मिळाले नाही. अखेर, त्याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावताच त्याने एक कोटी १३ लाख रुपयांचा धनादेश दिले. मात्र ते धनादेश देखील वठले नाही. पुढे पुन्हा मागणी करताच त्याने टाळाटाळ सुरू केली. तसेच तो पोलीस दलात असल्याने त्याचे काहीही करू शकत नाही अशी धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. अखेर, पाटील यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने माहीम येथे एका ठिकाणी इमारतीचा विकास करत असून तेथे स्वस्तात घर देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे तक्रारदारापैकी एकाने सांगितले.
हेही वाचा >>>मुंबई : छोट्या खोलीत सुरू होता एमडी बनवण्याचा कारखाना, मालवणी पोलिसांकडून दोघांना अटक
यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला. ते सध्या ठाकूर्ली येथे वास्तव्याला आहेत. आरोपी पोलीस दादर येथील पोलीस वसाहतीमध्ये राहत असताना दादर येथे भवानी शंकर रोड येथे मालकीची मोकळी जागा असून तेथे बांधकाम सुरु असल्याचे सांगितले. तेथे ४५ लाखांत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी १७ लाखांची गुंतवणूक केली. मात्र घर मिळाले नाही.