लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः चौकशीसाठी थांबविल्याचा राग आल्यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना गोवंडी परिसरात गुरुवारी घडली. आरोपींनी पोलिसाला ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार अफजल पिंजारी (४३) गुरूवारी गोवंडी बैगनवाडी परिसरात कार्यरत होते. यावेळी अमलीपदार्थ प्रतिबंधक गस्त सुरू होती. पिंजारी बैंगनवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका व्यक्तीला संशयावरून पोलिसांनी हटकले. पिंजारी यांनी त्याला ओळखपत्र दाखवून थांबण्यास सांगितले. यामुळे सदर व्यक्ती संतापली आणि तो पिंजारी यांच्या अंगावर धावून गेला. त्याने पिंजारी यांना शिवीगाळही केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे घटनास्थळी गर्दी जमली. गर्दीतील दोन व्यक्तीनी पिंजारी यांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. घटनेनंतर पिंजारी यांनी केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकावणे अशा विविध कलमांतर्गत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यांत अल्लाउद्दीन मेहताब आलम कुरेशी ऊर्फ बिच्छुम, शहाबुद्दीन मेहताब आलम कुरेशी ऊर्फ गोगा व निजामुद्दीन मेहताब आलम कुरेशी ऊर्फ छोटू यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.