मुंबईः सत्र न्यायालयात तोडफोड करून गोंधळ घालणाऱ्या महिलेविरोधात कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गोंधळ घालणाऱ्या महिलेला अडवण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसाच्या हाताचा तिने चावा घेतला. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी महिलेविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महिलेला ताब्यात घेण्यात आले असून वैद्यकीय तपासणीसाठी तिला ठाणे येथील मनोरुग्णालयात पाठवण्यात आले आहे. महिला पोलीस शिपाई वर्षा गायकवाड यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला सत्र न्यायालयात विनाकारण फिरत होती. तिने न्यायालयात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. न्यायालय सुरू असताना तिने सर्वांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. सदर महिलेने न्यायाधिशांच्या न्यायासनावरील काचही तोडली. यावेळी महिलेने स्वतःचे कपडे काढण्यास सुरुवात केली. तक्रारदार गायकवाड यांनी तिला थांबवले असता आरोपी महिलेने त्यांच्या हाताचा चावा घेतला. तसेच दुसऱ्या महिला पोलिसालाही धक्का देऊन पाडले. तसेच पोलीस व्हॅनमधील टॅबचे नुकसान केले.
हेही वाचा – मुंबई : अटल सेतूवर उडी मारलेल्या बँक उपव्यवस्थापकाचा मृतदेह सापडला
गायकवाड यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. महिलेविरोधात यापूर्वीही आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिला मानखुर्द येथील रहिवासी असून मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला ठाणे मनोरुग्णालयात नेण्यात आले असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.