मुंबईः मुंबईतील बोरिवली भागातील तीन जणांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी बनावट पासचा वापर केला. पण आता ३०० रुपयांचा बनावट पास बनवल्याप्रकरणी या तिघांविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना याप्रकरणी सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
बोरिवली पोलिसांनी गुरुवारी संजय झाला, अर्पित पटडिया आणि गिरीश सोलंकी यांना अटक केली. बोरिवलीतील कुणाल तुराकिया या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून त्यांना अटक करण्यात आली. तुराकिया ‘भूमी त्रिवेदी नवरात्री २०२३ सह रंगरास’ आयोजित करणाऱ्या आय-टेक इव्हेंट्सच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे कामकाज पाहतात. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य दोघे मुख्य आयोजक आहेत. या कार्यक्रमासाठी एका दिवसासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क आहे.
हेही वाचा… “पाकिस्तानी कलाकारांना विरोध ही देशभक्ती नव्हे”; बंदीची मागणी फेटाळताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
फाल्गुनी पाठक आणि किंजल दवे यांच्या लोकप्रिय गरबा आणि दांडिया इव्हेंटचे बनावट पासेसची विक्री करून फसविणाऱ्या टोळ्यांना अलिकडेच अटक झाल्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांच्या स्वयंसेवकांना अधिक सतर्क राहण्यासाठी सांगितले होते. गुरुवारी, स्वयंसेवकांनी झाला, पटडिया आणि सोलंकी यांना इव्हेंट पास वापरून प्रवेश घेण्याचा प्रयत्न करताना पकडले. तपासणीत ते पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
या तिघांना घटनास्थळी पथकासह तैनात असलेले पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे नेण्यात आले. तेव्हा पास बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर आरोपींनी पासबाबत समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. तिघेही बोरिवली भागातील असून ते नोकरी करतात.
त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ४२० (फसवणूक), ४६५ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४६८ (फसवणूक करण्याच्या हेतूने खोटी माहिती सादर करणे), ४७१ (कोणत्याही बनावट कागदपत्रांचा अप्रामाणिकपणे वापर करणे), आणि ३४ (सामान्य हेतू) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.