मुंबई: माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या ‘डीप फेक व्हिडिओ’प्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी एक फेसबुक वापरकर्ता आणि गेमिंग संकेतस्थळाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेंडुलकरचे स्वीय साहाय्यक रमेश पारधे यांनी पोलिसांत तक्रार केली होती.
रमेश पारधे यांनी केलेल्या तक्रारीनुसार फेसबुकवर एक चित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. तीत फेरफार करून सचिनचा आवाज वापरण्यात आला होता. ती मुलाखत अनेक वर्षांपूर्वी सचिन यांनी दिली होती. जुन्या चित्रफीतीत ‘डीप फेक’द्वारे बदल करून नवी चित्रफीत तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सचिन यांनी त्याची मुलगी गेमिंग अॅपवर जलद पैसे कमवत असल्याचे सांगून या ‘अॅप’चा प्रचार करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
हेही वाचा… “सूरज चव्हाण यांची अटक राजकीय, शिंदे गटाने ८ हजार कोटींचा…”, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
चित्रफीतीत फेरफार करून सचिन ऑनलाइन गेमची जाहिरात करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. याप्रकरणी फेसबुक वापरकर्ता (हुरमा) आणि गेमिंग संकेतस्थळाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.