ठाण्यातील नवघर येथील जमिनीच्या वादातून पाच कोटी रुपये व भूखंड खंडणी स्वरूपात मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू छोटा शकील याच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तक्रारदार डोंगरी परिसरातील रहिवासी असून जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. त्यांची ठाणे मौजे नवघर येथे जागा आहे. त्या जागेचा वाद मिटवण्यासाठी थेट छोटा शकीलने मध्यस्थी करून धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी छोटा शकील, आरीफ अबुबकर शेख ऊर्फ आरीफ भाईजान व बांधकाम व्यावसायिक जयेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जमिनीचा वाद मिटवण्यासाठी ५ कोटी रुपयांची खंडणी व ५० हजार चौरस मीटर जागा विकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी डोंगरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा खंडणीविरोधी पथकाला वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
दाऊदसह त्याच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात हवाला रॅकेटद्वारे पैसा उभा केला आहे. या पैशांचा उपयोग करून देशात महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणे, महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची हत्या करणे आणि या माध्यमातून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट आखला होता. याविषयी गुप्त माहिती मिळल्यानेच मुंबईत छापे टाकण्यात आले होते.पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी चालविणारा शकील शेख उर्फ छोटा शकील याच्या विरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. छोटा शकील याचा खंडणी, अंमलीपदार्थांची तस्करी, हिंसक कृत्य, तसेच दहशतवादी कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. अरिफ अबुबकर शेख आणि शब्बीर अबुबकर शेख हे दोघे शकीलच्या सांगण्यावरून दाऊद टोळीसाठी काम करत होते. शकीलकडून त्यांना पैसे पाठवण्यात आले आल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली होती. दोघेही १९९३ च्या मुंबई साखळी स्फोटांशी संबंधीत आहेत. दोघेही छोटा शकीलच्या थेट संपर्कात होते. आरोपींकडून पोलिसांनी पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत केली होती. गुन्हे शाखेने दाखल केलेल्या खंडणीच्या या नव्या प्रकरणात ते आरोपी आहेत.