मुंबई : मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये १४ खाती उघडून त्यातील रकमेचा निवडणुकीसाठी कथित गैरवापर केल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी मुंबई व अहमदाबाद येथील सात ठिकाणी छापे टाकले. त्यात मुंबईतील अंगडिया व्यवसायिकाशी संबंधित एका ठिकाणाचा समावेश आहे. या कारवाईत १३ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा गैरव्यवहार १२०० कोटी रुपयांचा असल्याचा संशय असून बनावट कंपनीद्वारे २१ बँक खात्यांतून करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्या एकल मालकी असून त्या नवी मुंबई, सूरत,अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – राज्यभरात थंडी पुन्हा परतणार; जाणून घ्या, असह्य उकाड्यापासून सुटका कधी मिळणार

या प्रकरणात राजकीय पक्ष व व्यक्तीच्या सहभागाबाबतही ईडी तपास करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सिराज अहमद हारून मेमन याने नाशिकमधील दोन बँकांमध्ये सुमारे १४ बँक खाती उघडली होती. त्यातील गैरव्यवहाराप्रकरणी मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवहार असे म्हटले आहे. तसेच या बेनामी बँक खात्यांमधून पैसे काढून निवडणुकीत गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. आरोपी सिराजने मालेगावमधील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अनेक बँक खाती उघडली होती. यामध्ये नागरिकांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून त्यांनी शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे भासवले होते. याप्रकरणी ईडीने शुक्रवारी अहमदाबाद येथील ६ व मुंबईतील एका ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत मुंबईतील अंगडियाच्या ठिकाणावर छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी १३ कोटी ३० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : मॅरेथॉनसाठी रविवारी विशेष लोकल

याप्रकरणी ईडीच्या तपासानुसार, मालेगाव येथील १४ बँक खात्यांमधून एकल मालकी कंपन्याच्या २१ बँक खात्यावर ९५ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. तपासात नवी मुंबई, सूरत,अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील २१ बनावट कंपन्यांची माहिती मिळाली असून त्यांच्या बँक खात्यात गेल्या तीन ते चार महिन्यात ८०० कोटी रुपये व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासानुसार नागाणी अक्रम मोहम्मद शफी व वासिम वलीमोहम्मद भेसानिया यांनी बनावट खात्यामधून मोठ्या प्रमाणत रक्कम काढण्याचे समजते. तसेच मुंबई, अहमदाबाद व सूरतमधील हवाला व्यावसायिकांनीही या खात्यातील रक्कम काढल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ते मेहमूद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याच्या सांगण्यावरून काम करत होते, असे चौकशीत सांगितले. त्यानुसार नागाणी अक्रम शफी व वासिम भेसानिया यांना ईडीने अटक केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case of misappropriation of crores through malegaon bank accounts ed raids in mumbai and ahmedabad mumbai print news ssb