राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अनुयायी मॅडेलीन स्लेड उर्फ मीराबेन यांनी लिहिलेल्या “द स्पिरिट्स पिलग्रिमेज” या साहित्यकृतीचा अनुवाद आणि प्रकाशनाच्या परवान्यावर आक्षेप मागवण्यासाठी जाहीर नोटीस काढा, असे आदेश उच्च न्यायालयाने स्वामित्त्वहक्क निबंधकांना दिले आहेत.मुंबईस्थित अनिल कारखानीस यांनी या प्रकरणी याचिका केली आहे. तसेच स्वामित्त्व हक्क कायद्याच्या कलम ३२ अंतर्गत स्लेड यांच्या साहित्यकृतीच्या अनुवाद आणि प्रकाशनाची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेऊन स्लेड यांच्या “द स्पिरिट्स पिलग्रिमेज” या साहित्यकृतीचा अनुवाद आणि प्रकाशनाच्या परवान्यावर आक्षेप मागवण्यासाठी जाहीर नोटीस काढण्याचे आदेश न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी दिले.
हेही वाचा >>>“उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा
स्लेड यांचे आत्मचरित्र १९६० मध्ये ओरिएंट लाँगमॅन प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रेट ब्रिटनमध्ये लाँगमॅन्स, ग्रीन अँड कंपनीने प्रकाशित केले होते. स्वामित्त्व हक्क कायद्याच्या कलम ३२नुसार, एखाद्या साहित्यकृतीच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या तारखेनंतर विशिष्ट कलावधी उलटून गेल्यावर संबंधित साहित्यकृती पुनर्प्रकाशित करण्याचा अधिकार आहे. शिवाय साहित्यकृतीचे लिखाण भारतात प्रकाशित झाले असावे, याचिका दाखल करण्याच्या सात वर्षांपूर्वी साहित्यकृती प्रकाशित होणे अनिवार्य आहे. याचिका नियमानुसार दाखल असावी हे स्वामित्त्व हक्क कायद्याच्या कलम ३२ अंतर्गत परवाना मिळविण्यासाठी या तीन निकषांची पूर्तता अनिवार्य आहे. या तिन्ही निकषांची पूर्तता केल्याचा दावा कारखानीस यांनी केला आहे.
हेही वाचा >>>मुंबई : मोनोरेल रेल्वे आणि मेट्रोशी जोडण्याचा मार्ग मोकळा
या साहित्यकृतीची एक संक्षिप्त आवृत्ती रंगा मराठे यांनी अनुवादित केली होती आणि या प्रकरणी प्रतिवादी असलेल्या किर्लोस्कर प्रेसने ती प्रकाशित केली होती. आजपर्यंत एकही प्रकाशक अस्तित्वात नाही. परिणामी कारखानीस यांना प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी अनुवादक, प्रकाशक यापैकी कोणीही उपलब्ध नसल्यामुळे न्यायालयात दाद मागत असल्याचेही कारखानीस यांनी सांगितले.