मुंबई : मुंबई – पुणे शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्या व्यावसायिकाला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले. आरोपीने दिलेल्या गुंगीच्या औषधामुळे व्यावसायिक तब्बल ८० तास बेशुद्ध होता. आरोपीने व्यावसायिकाकडील तीन लाख ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास असलेले व्यावसायिक शैलेंद्र साठे (५७) कामानिमित्त १४ जून रोजी मुंबईला जात होते. वाकड बस थांबा येथे ते शिवनेरी बसमध्ये बसले. दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील खालापूर फुड मॉल येथे बस थांबली असता सहप्रवाशाने त्यांना कॉफी आणून दिली. ती प्यायल्यानंतर शैलेंद्र बसमध्ये आपल्या जागेवर जाऊन बसले. मागोमाग सहप्रवासीही त्यांच्या बाजूच्या आसनावर बसला. काही वेळाने शैलेंद्र यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्यासारखे झाले आणि ते शुद्ध हरपले. त्यानंतर १८ जून रोजी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात शैलेंद्र यांना शुद्ध आली. तेव्हा त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने, मोबाइल व बॅग असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हेही वाचा – मुंबई : झोपमोड करणाऱ्या वृद्ध आईची हत्या

हेही वाचा – “बरं झालं, आमदारांना रुळावरून चालत जावं लागलं”, मनसेची सरकारवर बोचरी टीका; म्हणाले, “महाराष्ट्राला…”

रुग्णालयात उपचार पूर्ण झाल्यानंतर शैलेंद्र यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता आरोपी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी तेथे पथके पाठवली. तीन दिवस पाळत ठेऊन पोलिसांनी आरोपी युनुस शफिकुद्दीन शेख (५२) याला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A co passenger was robbed by giving him gungy medicine from coffee accused arrested from uttar pradesh mumbai print news ssb