मुंबई : १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची शुक्रवारी त्यांच्या दालनात भेट घेतली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या आमदारांनी विधान भवनात नार्वेकर यांची भेट घेतली. या वेळी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने नार्वेकर यांना दिले. अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे प्रकरण सोपविले आहे त्यावर लवकरात लवकर सुनावणी होईल, असा आम्हाला विश्वास असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार अनिल परब, शिवसेना ठाकरे पक्षाचे विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, आमदार रवींद्र वायकर, आमदार रमेश कोरगावकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. असेच पत्र यापूर्वीच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आले आहे.