मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवसैनिक दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दाखल होत आहेत. पुणे जिल्ह्यातील केसनंद गावातील शिवसैनिक मोहन यादव स्वतःची मोटारसायकल घेऊन शिवाजी पार्कमध्ये पोहोचले आहेत. शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींनी सजलेली ही मोटारसायकल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील केसनंद गावात राहणारे शिवसैनिक मोहन यादव हे गेल्या २७ वर्षांपासून दसरा मेळाव्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे येत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. असे असतानाही ते नित्यनियमाने दसरा मेळाव्यासाठी येत आहेत. त्यांची संपूर्ण मोटारसायकल शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींनी सजवलेली आहे. या मोटारसायकलवर मोहन यादव यांनी धनुष्यबाणाची प्रतिकृती, भगवा झेंडा, झेंडूच्या फुलांचे तोरण, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो, शिवसेनेच्या समर्थनार्थ विविध घोषणा असलेले फलक, बाळासाहेब व त्यांच्या पत्नी मीना ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावल्या आहेत. ही मोटारसायकल २७ वर्षांपूर्वी सजविण्यात आली असून या मोटारसायकलवरून मोहन यादव शिवसेनेचा प्रचार करीत असतात. विशेष बाब म्हणजे मोहन यादव यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांची नावे राज आणि उद्धव अशी ठेवली आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र यावेत अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुंबई: शिवसैनिकांची गर्दी आणि जोरदार घोषणाबाजी
‘मी एक कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसेनेची शान म्हणून ही मोटरसायकल शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींपासून सजविलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीही माझा सन्मान केला आहे. माझ्या पायावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत मी दसरा मेळाव्यासाठी येत राहणार’, असे मोहन यादव यांनी सांगितले.