मुंबई: नवीन प्रकल्पातील घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीकडून मोठी रक्कम घेऊन त्याची फसवणूक करणाऱ्या विकासकाला पंतनगर पोलिसांनी अटक केली. नीरज वेद (५४) असे या विकासकाचे नाव असून तो घाटकोपरमधील रहिवासी आहे.
तक्रारदार घाटकोपर परिसरात वास्तव्यास असून त्यांना घाटकोपरमध्ये आणखी एक घर घ्यायचे होते. यासाठी त्यांनी नीरज वेद यांची भेट घेतली. तीन वर्षांत नवीन प्रकल्पात घर देण्याचे आश्वासन वेद यांनी तक्रारदारांना दिले आणि त्यांच्याकडून ४६ लाख रुपये घेतले. मात्र अनेक दिवस उलटल्यानंतरही नवीन प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी पैसे परत करण्याची विनंती विकासकाला केली. मात्र विकासक टाळाटाळ करत असल्याने तक्रारदारांच्या लक्षात आले. अखेर तक्रारदारांनी पंतनगर पोलीस ठण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
हेही वाचा… नरिमन पॉईंट परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पर्याय
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून विकासकाला अटक केली. या विकासकाने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली असून या विकासकाविरोधात विविध पोलीस ठाण्यात दहा गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.