मुंबई : प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच ‘ललिता शिवाजी बाबर’ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाच्या टीझरचे अनावरण करण्यात आले. अभिनेत्री अमृता खानविलकर ललिता बाबर यांची भूमिका साकारणार आहे.
अनेक कठीण प्रसंगांचा सामना करून आज इथे पोहोचले आहे. आज माझा येथे सन्मान झाला, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी अमृता खानविलकर यांच्यासह सगळ्यांचेच खूप आभार मानते, असे ललिता शिवाजी बाबर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. ललिता शिवाजी बाबर यांना समजून घेण्यासाठी, गेल्या एक – दीड वर्षांपासून मी प्रयत्न करीत होते. ललिताताई बोलताना खूप भावनिक झाल्या.
ताईंचे साधेपण, बोलणे मनाला भिडले. माझ्यासाठी हा क्षण खास आहे. आता कुठे प्रवास सुरू झाला आहे. अजून खूप पळायचे आहे, असे ‘ललिता शिवाजी बाबर’ यांची भूमिका साकारणाऱ्या अमृता खानविलकरने सांगितले. ‘ललिता शिवाजी बाबर’ हा चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.