मुंबई: शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या माटुंग्यातील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयात बुधवारी वर्ग सुरू असताना पंखा पडल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
सध्या माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात इमारतीच्या डागडुजी व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यासह विद्युत उपकरणांची तपासणी व दुरुस्तीही करण्यात येत आहे. मात्र एका वर्गात बुधवारी (७ ऑगस्ट) एम. ए फिलॉसॉफी या अभ्यासक्रमाची तासिका सुरू होती आणि वर्गात विद्यार्थी बसले होते. वर्ग सुरू असतानाच बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास अचानक एक पंखा पडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या दुर्घटनेनंतर काही काळ विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विद्यार्थ्यांनी तात्काळ महाविद्यालयातील वरिष्ठ शिक्षक व अधिकाऱ्यांकडे धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
हेही वाचा >>>World Tribal Day: आरेमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यास मनाई ?
‘सर्वच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे आवश्यक आहे. विद्युत उपकरणांची तपासणी व दुरुस्ती करण्यासाठी सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठवावे, याबाबत मुंबई विद्यापीठाकडे पाठपुरावा करू,’ असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व दक्षता घेत आहोत
‘रुईया महाविद्यालयाची इमारत जुनी आहे. त्यामुळे डागडुजी व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. परंतु अचानकपणे एका वर्गात पंखा पडल्याची घटना घडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. इमारतीच्या डागडुजीसह विद्युत उपकरणांचीही दुरुस्ती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे’, असे रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर यांनी स्पष्ट केले.
© The Indian Express (P) Ltd