मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील बहुमजली इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. या आगीत दोन जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, मुंबईत लक्ष्मीपूजन आणि पाडव्याचा उत्साह सुरु असतानाच या उत्साहाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी मुंबईत चार ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. गोरेगावमध्ये दोन तर शीव आणि अंधेरी येथे एका ठिकाणी अशा चार आगीच्या घटना घडल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थनगर, प्रबोधन उद्यानानजीक असलेल्या कल्पतरू रेसीडेन्सी या ३२ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शनिवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आग लागली. ही आग भीषण होती. आग लागल्याने इमारतीतील रहिवाशांची बाहेर पडण्यासाठी एकच धावपळ झाली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविण्याससह रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यास सुरुवात केली. इमारतीत सर्वत्र धूर पसरल्याने उद्ववाहन बंद करत अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत मोठ्या संख्येने रहिवाशांना सुखरूप जिन्याने बाहेर काढले. तर काही तासांनी आगीवर नियंत्रण आणण्यात यशही मिळाले. मात्र या आगीत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ट्राॅमा केअरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनोज चौहान (३०) व शहाबुद्दीन अन्सारी (५०) अशी जखमींची नावे असून धुरामुळे त्यांचा श्वास गुदमरला होता. शहाबुद्दीनने डाॅक्टरांच्या सल्ल्याविना रुग्णालायातून शनिवारीच सुट्टी घेतली असून मनोज चौहान यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा >>>“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”

बहुमजली कल्पतरु इमारतीला नेमकी कशामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आगीच्या कारणांचा तपास सुरु असून तपासाअंतीच आगीचे कारण स्पष्ट होईल. गोरेगावमधील आग भीषण असतानाच ऐन दिवाळीत आणखी तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील लाकडी गोदामाला आग लागली आणि यात आसपासच्या अनेक झोपड्यांचे नुकसान झाले. यात कोणतीही जखमी झाले नाही. तर दुसरीकडे शीव येथील षण्मुखानंद सभागृहा नजीकचे शिधा वाटप कार्यालयही आगीच्या भक्ष्यस्थानी आले. गोरेगावमधील हब माॅलजवळील लोढा फेयोरेन्झ या ३० मजली इमारतीलाही आग लागली. एकूणच दिवाळीदरम्यान लागलेल्या आगीमुळे दिवाळीच्या उत्साहाला गालबोट लागले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fire broke out at a building in goregaon mumbai print news amy