मुंबई : पोटदुखी, जुलाब त्याचबरोबर रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव या समस्येने त्रस्त असलेल्या महिलेच्या पोटात गाठ असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून पावणेपाच किलो वजनाची गाठ काढून तिला जीवदान दिले. ही गाठ कर्करोगाची आहे का याची तपासणी करण्यासाठी ती प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे.

कुलाबा येथे राहणारी ५४ वर्षीय महिला आठवडाभरापासून पोटात दुखणे, वारंवार जुलाब होणे याबरोबरच रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होत असल्याने १ जुलै रोजी कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आली. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिला रुग्णालयात दाखल करून घेतले. या महिलेला एक मूल असून एकदा गर्भपात झाला आहे, तर एका बाळाचे जन्मानंतर निधन झाल्याचे तिने तपासणीदरम्यान डॉक्टरांना सांगितले. पोटात वारंवार दुखत असल्याने डॉक्टरांनी या महिलेची ५ जुलै रोजी सोनोग्राफी केली. त्यामध्ये तिच्या पोटात अंडाशयात मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याची खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांनी ६ जुलै रोजी जे. जे. रुग्णालयामध्ये तिची एमआरआय चाचणी केली. यामध्ये तिच्या पोटात अंडाशयाच्या डाव्या बाजूला मोठी गाठ असल्याचे आणि गर्भाशयाचा आकार मोठा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या महिलेच्या काही रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्या सदोष आल्या.

हेही वाचा – अपघातापूर्वी मिहीरने मालाड येथून बिअर खरेदी केली, गिरगाव ते सागरी सेतूपर्यंत मिहीरने मोटरगाडी चालवली

हेही वाचा – राज्याचा आरोग्य विभागच सलाईनवर, तब्बल २० हजार पदे रिक्त

रक्त तपासण्यांमध्ये महिलेला नव्याने उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असल्याचेही निदान झाले. सर्व तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर ९ जुलै रोजी कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. शिरिष शेठ आणि डॉ. विजया बाब्रे यांनी या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून पावणेपाच किलो वजनाची गाठ बाहेर काढली. त्यानंतर या महिलेला जी.टी. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. या महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. तसेच ही गाठ कर्करोगाची आहे का याची तपासणी करण्यासाठी ती प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.