मुंबई : खाद्यपदार्थांच्या बंदिस्त गाड्या म्हणजेच फूड ट्रकबाबतचे धोरण गेल्या किमान दोन – तीन वर्षांपासून रखडलेले असताना वांद्रे येथील उच्चभ्रू वस्तीत दोन ठिकाणी एका पंचतारांकित हॉटेलच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या करण्यासाठी पालिका प्रशासनाने विशेष परवानगी दिली आहे. कार्टर रोड आणि बॅण्ड स्टॅण्ड येथे या गाड्या गेल्या आठवड्यापासून उभ्या आहेत. या परिसरातील रहिवाशांनी या गाड्यांना आक्षेप घेतला आहे.
पालिकेने २०२० मध्ये नाईट लाईफ अर्थात रात्रीची मुंबई ही संकल्पना राबवण्याचे ठरवले. तेव्हा पर्यटनस्थळी फूड ट्रक म्हणजेच खाद्यपदार्थांच्या बंदिस्त गाड्या उभ्या करण्यास परवानगी देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्याकरीता धोरणही ठरवण्यात आले होते. मात्र हॉटेल चालकांच्या संघटनेने या धोरणाला विरोध केला होता. अनेक त्रुटी असल्यामुळे अखेर हे धोरण रद्द करण्यात आले होते. तसेच नवीन धोरण ठरवण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. हे धोरण गेल्यावर्षी पालिकेने तयार केले. या धोरणाअंतर्गत समाजातील गरीब घटकांतील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच मुंबईकरांना स्वस्तात चांगले खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत अशी या मागची कल्पना होती. मात्र वांद्रे परिसरात एका पंचतारांकित हॉटेलच्या दोन गाड्या दिसू लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
याप्रकरणी वांद्रे येथील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून आक्षेप घेतला आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या करण्यासाठी विभाग स्तरावर एका समितीने निर्णय घ्यायचा आहे. गाडी उभी करण्यासाठी जागा, स्वच्छता हे मुद्दे या समितीने तपासायचे आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे रहिवाशांचा आक्षेप असू नये ही देखील अट आहे. मात्र या दोन गाड्या उभ्या करताना पालिकेने कोणतेही नियम पाळलेले नाहीत, असा आरोप झकेरिया यांनी पत्रात केला आहे.
या दोन गाड्यांना रहिवाशांनी आक्षेप घेतला असून या गाड्यांमुळे रस्त्यावर खूप गर्दी होते, तसेच या गाड्या निवासी इमारतींच्या बाहेर उभ्या केल्या जात असल्यामुळे त्याचा त्रास होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. गाड्यांच्या अवतीभवती दुचाकी उभ्या करून नागरिक खाद्यपदार्थ घेत असतात, खात असतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथील रहिवासी संघटना परिसरात स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्नशील असताना अशा गाड्यांमुळे अस्वच्छता होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे, असेही झकेरिया यांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा – मुंबई-जीवी : फिडलर खेकडे
सहा महिन्यांसाठी परवानगी
या दोन गाड्यांना केवळ सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्यात आली आहे. उपाहारगृहांसाठी ज्या पद्धतीने परवाना दिला जातो तशा धर्तीवर हा तात्पुरता परवाना दिला आहे. ही परवानगी कायमस्वरुपी नाही. सहा महिन्यांत रहिवाशांच्या सूचना किंवा वाहतूक कोंडी होते का हे सारे तपासून मग पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. – विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त, एच पश्चिम