लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: अंधेरी पूर्व येथील साकीनाका परिसरातील एका पाच मजली इमारतीला शनिवारी भीषण आग लागली. इमारतीमधील वीज मीटरला लागलेल्या आगीचा भडका उडाला आणि परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. या इमारतीमध्ये एकूण ३३ रहिवासी अडकले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी ३३ रहिवाशांना सुखरुपपणे इमारतीतून बाहेर काढले.
साकीनाका परिसरातील ९० फूट रस्त्यावरील डिसोझा कम्पाऊंडमधील साकी हाऊसिंग सोसायटीतील वीज मीटरला शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास आग लागली. क्षणार्धात आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. ही आग तळमजला आणि पहिल्या मजल्यावर पसरल्याने इमारतीत रहिवासी अडकले होते. आगीमुळे इमारतीमध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते. धुरामुळे रहिवाशांना जिन्यावरून खाली येणे शक्य होत नव्हते.
हेही वाचा… फरार आरोपीला आठ वर्षांनंतर अटक
घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्यांनी शनिवारी सकाळी १०.४६ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ३३ रहिवाशांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या दुर्घटनेत काेणीही जखमी झाले नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.