मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील गंज ठिपके मांजरांमधील (रस्टी स्पॉटेड कॅट) एका नर मांजराचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या या प्रजातीच्या वाढीसाठी उद्यानातर्फे एक प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे मांजर इथे आणण्यात आले होते.
मार्जार कुळात समावेश असणाऱ्या आणि जंगलामधील सर्वात लहान आकाराचे मांजर समजल्या जाणाऱ्या गंज ठिपके मांजर या प्रजातीच्या वाढीकरिता २०१३ साली राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. गेल्या सहा वर्षांपासून या मांजरांचा प्रजनन प्रकल्प इथे सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत गंज ठिपके मांजरांचा पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न केला जात होता. अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच आणि जगातील दुसरा प्रकल्प आहे. यासाठी तज्ज्ञ समितीच्या नेमणुकीबरोबरीनेच जागतिक पातळीवर काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते. मात्र कालांतराने नवीन प्रशासनाचा यामधील उत्साह मावळला. तुंगारेश्वर अभयारण्यात २००५ साली बेवारस अवस्थेत सापडलेले गंज ठिपके मादी मांजर (जिचे नाव अंजली ठेवण्यात आले) राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या सचिन नामक नर मांजर आणि अंजलीमध्ये घडलेल्या यशस्वी प्रजननामुळे त्यांना पुढे पिल्ले झाली. शिवाय सातारा जिल्ह्य़ात २००९ साली सापडलेल्या वेदिका नामक मादी मांजरालाही राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. २०१३ साली सुरू करण्यात आलेल्या प्रजनन प्रकल्पामध्ये अंजली आणि वेदिका यांच्यासह त्यांच्या सत्यम, शिवम, सुंदरम आणि भाग्य या चार नर पिल्लांचा समावेश करण्यात आला.
या सहा मांजरांची वंशावळ सारखीच असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रजनन होणे शक्य नव्हते. त्यासाठी बाहेरून मांजर आणण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले. याअंतर्गत गेल्या वर्षी म्हैसूर प्राणिसंग्रहालयातील दोन मादी मांजरांना देण्याची विनंती राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने केली होती. मात्र मादी मांजरांना झालेल्या त्वचा संसर्गाचे कारण देत प्राणिसंग्रहालयाने या विनंतीला नकार कळविला होता.
मांजराची वैशिष्टय़े
* जंगलातील सर्वात लहान मांजराची प्रजात
* मांसभक्षी असून हा प्राणी निशाचर आहे.
* १४ ते १७ इंच रुंद असून सुमारे दीड किलो वजन
* ७० दिवसांचा प्रजननाचा कालावधी