मुंबई: पंधरा कोटी रुपयांच्या कोकेन तस्करीप्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नवी दिल्लीतून ३० वर्षीय परदेशी महिलेला अटक केली. याप्रकरणी मुंबईतील विलेपार्ले परिसरातून १५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले होते. त्या गुन्ह्यांत अटक केलेल्या परदेशी महिलेचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
रेहेमा ऑगस्टिनो म्बोनेरो (३०) असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलेचे नाव असून ती मूळची टान्झानिया देशाची नागरिक आहे. आरोपी महिलेला नवी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने विलेपार्लेयेथील देशांतर्गत विमानतळाच्या शेजारी असलेल्या एका आलीशान हॉटेलमध्ये ९ नोव्हेंबरला कारवाई करून एनसीबीने दोन किलो कोकेन जप्त केले होते. याप्रकरणी गिलमोर लेसी अॅन्डी (२५) नावाच्या झांबिया देशाच्या नागरिकाला अटक केली होती. याप्रकरणी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा… महारेराचे समुपदेशन ग्राहक आणि विकासकांना ठरतेय फायदेशीर, महिन्याला ३०० ते ३५० जणांना सेवेचा लाभ
चौकशीत आरोपी अनेक दिवसांपासून परदेशातून भारतात कोकेन घेऊन येत असल्याचे सांगितले. त्या बदल्यात त्याला पैसे मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने मुख्य आरोपींच्या सहभागाबाबत तपासाला सुरूवात केली. आरोपीची अधिक चौकशी केली असता जप्त करण्यात आलेले दोन किलो कोकेन आरोपीला नवी दिल्लीत पोहोचवायचे होते. त्यानंतर एनसीबीचे एक पथक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी कोकेन तस्करीबाबत माहिती घेतली असता याप्रकरणी रेहेमा या परदेश महिलेचा सहभाग उघड झाला. तिला ताब्यात घेेऊन चौकशी केली असता तिचाही याप्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. अखेर तिला याप्रकरणी अटक करून दिल्लीतील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तेथे ट्रान्झिट रिमांड घेऊन परदेशी महिलेला मुंबईत आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करत असून या मागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.