मुंबई : स्नॅपचॅटवर झालेल्या मैत्रीनंतर मुलीला तिच्या अश्लील छायाचित्रांद्वारे धमकावणाऱ्या २३ वर्षीय तरूणाला निर्मल नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. गेल्या वर्षभरापासून आरोपी पीडित मुलीला धमकावत होता, अखेर त्रासाला कंटाळून तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

तक्रारदार मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून खार परिसरात राहते. २०२४ मध्ये तिची ओळख आरोपीसोबत स्नॅपचॅट या समाज माध्यमावर झाली. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले. पण आरोपी गेल्यावर्षीपासून तिला धमकावू लागला. महाविद्यालयातील इतर मुलांसोबत ती बोलत असल्याने त्याला राग येत होता. त्यातून तो तिच्यावर संशय घेऊ लागला. तिला शिवीगाळ करू लागला. तक्रारदार मुलगी महाविद्यालयात जात असताना तिचा पाठलाग करू लागला. त्यावेळी कोणाशी बोलताना पाहिल्यावर तिला दूरध्वनी करून धमकावू लागला. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीसोबत काढलेले छायाचित्र समाज माध्यमांवर वायरल करण्याची, तसेच कुटुंबियांना दाखवण्याची धमकी त्याने दिली. तुझ्या कुटुंबियांना बघून घेईन, तसेच तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन असेही तो धमकावू लागला. त्यामुळे पीडित मुलगी गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होती. आरोपी तरूण दिवसेंदिवस तिला धमकावत होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या परिचित व्यक्तीला सांगितला. त्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितल्यानंतर पीडित मुलीने धाडस करून निर्मल नगर पोलिसांकडे आरोपीविरोधात तक्रार केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७८, ३५२, ३५१(२) सह पोक्सो कायदा कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित मुलीकडून आरोपीची माहिती घेऊन अखेर पोलिसांनी सोमवारी सापळा रचून तरूणाला अटक केली.

आरोपी मूळचा नाशिक येथील देवळा तालुक्यातील रहिवासी आहे. आरोपी खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या कंपनीत कामाला आहे. आरोपी पीडित मुलीच्या घरी आला होता. त्यावेळी दोघांचेही खासगी छायाचित्र आरोपीने काढल्याचा दावा त्याने केला आहे. त्याद्वारे पीडित मुलीला तो धमकावत होता. त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला असून तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला असता त्याच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader