मुंबई : उपनगरी रेल्वेगाड्यांमधील महिलांच्या डब्यात घुसून तीन ते चार तरुण बाबा-बुवांच्या जाहिराती चिकटवून पसार होत आहेत. या टोळ्यांवर कारवाई केली जात असल्याचे रेल्वे प्रशासन सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात ही टोळी सक्रिय असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणाऱ्या उपनगरी गाड्यांच्या डब्यांत अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार वाढले आहेत. दिशाभूल करणारी माहिती या जाहिरातींतून दिली जात आहे. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बाबा-बुवांच्या जाहिराती लावल्या जात आहेत. याविरोधात कारवाई केली जात असूनही असे प्रकार वारंवार घडत आहेत. भरदिवसा अशा जाहिराती चिकटवल्या जात आहेत. हजारो प्रवाशांच्या देखत तरुणांची टोळी उपनगरी रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये घुसून जाहिराती चिटकवत आहे. असे प्रकार महिलांच्या डब्यातही घडत आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांच्या डब्यात तरुणांची एक टोळी शिरली आणि त्यांनी जाहिराती चिटकवल्या. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘‘हार्बर मार्गावरून मी रोज प्रवास करीत आहे. दुपारी अडीचच्या सुमारास मस्जिद बंदर स्थानकात काही तरुण महिलांच्या डब्यात घुसतात. महिला डब्यात बाबा-बुवांच्या जाहिराती लावून पळ काढतात. या झटापटीत एका महिलेला जोरदार धक्का लागला होता, असे एका महिला प्रवाशाने सांगितले.

हेही वाचा – मुंबई : शिवनेरी अटल सेतूवरून चालवण्याचा विचार

महिलांच्या डब्यांत अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार वाढल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. याविरोधात वेळोवेळी कारवाई केली जाते. भोंदूबाबाच्या जाहिरातीमधील माहिती ही चुकीची असते. त्यामुळे जाहिरातीतून चुकीचा प्रसार केला जातो. दुपारच्या वेळेत जाहिरात लावल्या जात असतील तातडीने कारवाई केली जाईल. – डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हेही वाचा – मुंबई : राजन साळवींच्या पत्नी-मुलाची अटकेची टांगती तलवार कायम

रेल्वे पोलिसांच्या गस्ती पथकांना दुपारच्या वेळी सीएसएमटी, मस्जिद परिसरात पाचारण करण्यात येईल. स्थानकांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासून महिला डब्यातून पुरुष प्रवासी उतरत असल्याचे दिसल्यास यावर कारवाई करण्यात येईल. – विजय तायडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A gang is active in central railway pasting fake advertisements in women coaches mumbai print news ssb
Show comments