मुंबई: एटीएम केंद्रामध्ये रोख रक्कम काढण्यासाठी आलेल्या बँक ग्राहकांचे पैसै चोरणाऱ्या ६ जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले. कुरार पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींनी इतर ठिकाणीही अशा प्रकारे चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुरार पोलिसांच्या हद्दीतील शिवाजी नगर परिसरात एका बँकेच्या एटीएम केंद्रावर तक्रारदार २१ डिसेंबर रोजी पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे केल्यानंतरही यंत्रातून पैसे बाहेर आले नाहीत. आरोपींनी एटीएम यंत्राच्या कॅश डिस्पेन्सरला फेविक्विक आणि सेलोटेप चिटकवले होते. त्यामुळे ती रक्कम बाहेर आली नाही. त्यानंतर आरोपींनी ती रक्कम काढली होती. याची तक्रार त्यांनी कुरार पोलिसांना केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, संजीव गावडे आणि पथकाने तपास सुरू करून सदर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पडताळणी केली. एक रिक्षा संशयितपणे या परिसरात फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्या रिक्षाचा क्रमांक मिळवला आणि आप्पा पाडा रिक्षा थांब्याजवळून चौघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीमध्ये त्यांच्याकडे एटीएम यंत्रामध्ये छेडछाड करताना कॅश डिस्पेन्सरवर चिकटवण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या २७ पट्ट्या, फेविक्विकचे २५ पाऊच तसेच ६ ट्यूब, पांढऱ्या रंगाच्या सेलोटेप, वेगवेगळ्या बँकांची १० एटीएम कार्ड आणि तक्रारदाराचे चोरलेले दोन हजार रुपये सापडले. त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली.

हेही वाचा – मुंबई : गर्दी असलेल्या लोकलमध्ये तिकीट तपासणी सुरू

हेही वाचा – मुंबई : धुलीकणांचे प्रमाण वाढले, देवनारमधील हवा ‘अतिवाईट’, शीव, मालाड, वांद्रे-कुर्ला संकुलमधील हवा ‘वाईट’

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रामू राम उर्फ आदित्य भारतीया (२९), सूरज तिवारी (२२), संदीप कुमार यादव (२४), अशोक यादव (३६), राकेश कुमार यादव (४०) आणि रवी कुमार यादव (३१) अशी आहेत. या टोळीने समता नगर पोलिसांच्या हद्दीतही असाच प्रकार केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या प्रयागराज या ठिकाणी त्यांच्यावर एकूण ११ गुन्हे दाखल असून त्यांचे अन्य कोणी साथीदार आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A gang of six people who stole money from an atm center were arrested action by kurar police mumbai print news ssb