लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: उच्चभ्रू इमारतीमध्ये जाऊन महागड्या चपला चोरणारी महिलांची एक टोळी सध्या मुंबईत सक्रिय आहे. या महिलांनी घाटकोपर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये मोठया प्रमाणात चपलांची चोरी केली असून सीसी टीव्ही कॅमेऱ्यात चप्पल चोरीची घटना कैद झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
गेल्या काही दिवसांपासून घाटकोपरमधील अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रहिवाशांच्या महागड्या चपला गायब होत होत्या. काही रहिवाशांनी याकडे दुर्लक्ष केले. घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेनमधील कमलकुंज सोसायटीमध्ये दोन वेळा चप्पल गायब झाल्या. त्यामुळे येथील रहिवाशांनी सोसायटीच्या आवारातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. दोन महिला चपला चोरत असल्याचे चित्रणात निदर्शनास आले.
हेही वाचा… साकीनाका परिसरात अग्नितांडव; अग्निशमन जवानांनी वाचवले ३३ जणांचे प्राण
याबाबत अधिक माहिती घेतली असता काही महिला घरकाम शोधण्याच्या बहाण्याने इमारतीमध्ये आल्या होत्या. याच वेळी महिलांनी घराबाहेरील चपला चोरून पोबारा केला. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलांनी जुन्या चपलाना हातही लावला नाही. केवळ दोन – तीन हजार रुपये किमतीच्या महागड्या चपला घेऊन त्यांनी पळ काढल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणातून उघड झाले. याबाबत अद्याप आमच्याकडे तक्रार आलेली नाही. मात्र तक्रार आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी सांगितले.