मंगल हनवते
म्हाडाच्या माध्यमातून हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीमधील स्पर्धेत सहभागी न होता मुंबई महानगरात म्हाडाचे घर घेण्याची सुवर्णसंधी इच्छुकांना उपलब्ध होणार आहे. कोकण मंडळाच्या आगामी सोडतीतील २०७७ घरांचा समावेश ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्व’ योजनेत करण्यात येणार आहे. या योजनेनुसार अनामत रक्कमेसह सर्वात आधी अर्ज भरणारी व्यक्ती थेट घरांसाठी विजेती ठरणार आहे. म्हात्त्वाचे म्हणजे इच्छुकांचे मुंबई वा महाराष्ट्रात कुठेही, कितीही घरे असली, उत्पन्न कितीही असले आणि याआधी सरकारी योजनेतून घर घेतले असले तरी म्हाडाचे घर विकत घेता येणार आहे. १५ वर्षांपेक्षाही अधिक काळानंतर मुंबई महानगर प्रदेशातील घरांची अशा प्रकारे घरे विकली जाणार आहेत.
हेही वाचा >>>पोटनिवडणुकीसाठी आघाडीत एकीचे प्रयत्न; कसबा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा
कोकण मंडळाकडून अंदाजे ४७२१ घरांची सोडत काढण्याची तयारी सुरू आहे. या सोडतीत विरार – बोळीजमधील २०४८ आणि इतर ठिकाणच्या २९ घरांचा समावेश ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेत करण्यात आला आहे. ही घरे विक्रीविना पडून आहेत. म्हाडा कायद्यानुसार तीन वेळा सोडतीत समाविष्ट करूनही विक्री न झालेली घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर विकण्याची तरतूद आहे. त्यानुसार मुंबई आणि कोकण वगळता इतर मंडळाकडून अशी घरे विकण्यात येतात. मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांना मोठी मागणी असते. त्यामुळे मुंबई – कोकण मंडळाच्या घरांची विक्री अशा प्रकारे करण्याची वेळ कधी आली नव्हती. पण आता मात्र कोकण मंडळाला या योजनेअंतर्गत २०७७ घरांची विक्री करावी लागणार आहे. विरार-बोळीज आणि इतर ठिकाणची नाकारलेली, विक्री न झालेली ही घरे आहेत. यापूर्वी २००४ मध्ये कोकणातील घरे या योजनेनुसार विकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. २०१६ पासून पडून असलेली घरे विकली जावी या उद्देशाने कोकण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. कोकण मंडळाच्या या निर्णयामुळे स्वतःच्या नावावर कुठे आणि कितीही घरे असली आणि याआधी म्हाडाचे वा कुठल्याही सरकारी योजनेत घर घेतले असले तरी संबंधितांना म्हाडाचे घर घेता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी उत्पन्नाचा दाखला वा आयकर विवरण पत्राची आवश्यकता नाही. केवळ आधार कार्ड, पॅनकार्ड आणि निवासाचा दाखला आवश्यक असेल. सामाजिक आणि इतर आरक्षण असल्यास त्यासंबंधीचे प्रमाणपत्र आवश्यक असेल.
हेही वाचा >>>मुंबई महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प; ५०,००० कोटींवर आकारमान?
कोकण मंडळाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सोडतीच्या काही दिवस आधी नोंदणीधारकांना निश्चित कालमर्यादेत अनामत रक्कमेसह अर्ज भरावा लागेल. सर्वात आधी अनामत रक्कमेसह अर्ज भरणारे या घरांसाठी विजेते ठरतील. तर जितकी घरे आहेत तितकेच अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे २०७७ अर्ज अनामत रक्कमेसह भरले गेली की या घरांसाठीची अर्जस्वीकृती तात्काळ बंद केली जाणार असल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे सर्वात आधी अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. यासाठीची अनामत रक्कम घराच्या एकूण रक्कमेच्या १० टक्के वा त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. पण या योजनेमुळे अगदी सहजरित्या म्हाडाचे घर घेता येणार आहे. ही घरे विक्री न झालेली, विजेत्यांनी नाकारलेली आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा >>>मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करा ; मुख्यमंत्र्यांचे महापालिका आयुक्तांना आदेश
मुंबई आणि कोकण मंडळाची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असे मागील कित्येक महिन्यांपासून सांगितले जात आहे. पण जाहिरात, सोडतीची प्रतीक्षा लांबत आहे. दोन्ही मंडळानी जाहिरातीची तयारी सुरू केली आहे. कोकण मंडळाची जाहिरात पुढील आठवड्यात, तर मुंबई मंडळाची जाहिरात १५ फेब्रुवारीदरम्यान प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
बुधवारपर्यंत ८४ हजार इच्छुकांकडून नोंदणी
नव्या बदलानुसार कायमस्वरूपी नोंदणीला ५ जानेवारीपासून सुरुवात झाली. बुधवारपर्यंत ८४ हजार इच्छुकांनी नोंदणी केली. तर पुणे मंडळातील घरांसाठी अंदाजे १९ हजार अर्ज सादर करण्यात आले आहेत. यातील अंदाजे ९ हजार अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.