मुंबई : ‘महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री’, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटले. यावरून शिंदे यांच्या पुत्राने उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली, तर मोदींची भेट ही शिंदे यांच्या निरोपाची भेट होती, असा टोला ठाकरे गटाने लगावला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी सहकुटुंब पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनिमित्त मोदी यांनी ट्वीट करीत शिंदे यांचे कौतुक केले. ‘महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौस्तुकास्पद आहे,’ असे मराठीत मोदी यांनी ट्वीट केले आहे.
मोदी यांनी शिंदे यांचे कष्टाळू आणि गतिशील असे कौतुक केल्याने सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांना नाइलाजाने स्वीकारावे लागणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये मोदी यांच्या ट्वीटमुळे अस्वस्थता पसरणे स्वाभाविकच होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाने मात्र शिंदे यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. ‘मोदी यांची ही भेट म्हणजे निरोप समारंभ होता’, अशी टिप्पणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. तर शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हकालपट्टी होणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लगावला.
ठाकरे गटाने शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शंका व्यक्त करताच शिंदे यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. ‘कष्ट टाळू मुख्यमंत्री ते कष्टाळू मुख्यमंत्री. महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास’ अशा शब्दांत खासदार शिंदे यांनी ठाकरे यांना लक्ष्य केले. मोदी यांनी चार दिवसांत दोनदा शिंदे यांना भेट दिल्याने तसेच त्यांचे तोंडभरून कौतुक केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. अर्थात यावर कोणी व्यक्त झालेले नाही. पण गेल्याच महिन्यात शिंदे यांच्या शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली होती. याबद्दल भाजपच्या राज्य नेत्यांनी नापसंती व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रकार टाळायला हवा, असे मतप्रदर्शन केले होते. पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांना कष्टाळू आणि गतिशील अशी उपमा दिल्याने भाजप नेत्यांचीच पंचाईत झाली आहे.